नम्र निवेदन

सूचना :-

भक्तांना नम्र निवेदन

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव कडून श्रीं च्या नांवाने असलेली मंदिरे, संस्था, मंडळ व भक्तांना नम्र सूचित करण्यात येते की, संस्थानचे ध्येय उद्देश सामान्य जनते समोर विदित करीत आहोत
संस्थान पैसा व प्रसिद्धीकरिता आटापीटा करीत नाही. आपआपल्या धर्माप्रती व श्रीं वर असलेल्या  श्रद्धेला, भावनेला तडा जाऊ नये व मानवतेची सेवा घडावी हाच उद्देश.

श्रद्धा, भक्ती व विश्वास ठेवण्यास पैसा लागत नाही. सुविधा व व्यवहाराकरिता पैसा लागतो, तो ही आवश्यक तितका. या उद्देशानुसार सर्व ठिकाणी सेवाभावनेतून सेवा सर्वांकडून घडून येत आहे. याच भक्तिभाव तत्त्वानुसार पुढेही सेवाकार्य घडावे हाच उद्देश ठेवून सर्वांनी सेवा देत रहावी. निदान श्रींच्या नावाने स्वार्थरहित सेवा होत असेल तेथे योगदान, सहयोग देत रहावा. इतरत्र मात्र सतर्क राहावे.

वरील संस्थेचा उद्देश लक्षात न घेता श्रींच्या नावाने मंदिरे, मंडळ, संस्था स्थापिल्या जातात. घरोघरी मंदिरे झाल्यास चालतील परंतु कर्तव्य व हेतू हा शुद्ध असावयास पाहिजे. याचकरिता भक्तांनी सखोल चौकशी करून आपल्या श्रद्धा, विश्वासाला तडा न जाता मदत करण्याचा योग्य तो निर्णय घ्यावा. बोर्ड, बॅनर, प्रसिद्धी पत्रकात भावनिक बोलून प्रसिद्धी करणे अशा बाह्य प्रलोभनावर अजिबात विश्वास ठेऊ नये. डोळसपणे अवलोकन करावे व नंतरच काय ते ठरवावे. अशी आपण दक्षता न घेतल्यास वा वरील उद्देशापैकी चालकांनी काही विपरीत केल्यास भावनेला धक्का बसेल व दोष शेगांव संस्थेवरही येण्याची शक्यता आहे. तो येऊ नये म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावी. असा विषवृक्ष फैलू नये म्हणून अशा सर्व बाबीं पासून सर्वांनीच सावध असावे.

बाह्य सर्व परिस्थिती ही आपली संस्कृती, धर्मभावना यावर आघात करणारी दिसते आहे. धर्म, श्रध्दा, कर्तव्य न जोपासता पैसा व प्रसिध्दीकरीता बुध्दीचे चातुर्य, विधायक दृष्टिकोन न ठेवता चतुराई करून स्वस्वार्थाकरिता, फसवेगिरी करतानाच दिसत आहे, असे दिसते आहे. दृढ भावना स्थिर व बुद्धी अस्थिर आहे म्हणून सद्बुध्दी सतत जागृत राहावी. त्याकरिता  संतांनी दिलेल्या ग्रंथरूपी मार्गदर्शनावरच आपले जीवन व्यापक करावे हीच आज भारताची व आपली आवश्यकता झाली आहे. धर्म हा भारताचा प्राण आहे. या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य करणाऱ्याच्या पाठिशी एकमताने रहावे.

भक्तांकरीता वेळोवेळी संस्थानकडून फसगत होऊ नये म्हणून सूचित केले जाते. कोठे गैर कांही आढळल्या संस्थेशी संपर्क साधावा.

देशात अनेक व्यक्ती वा अनेक संस्था सर्वस्वी मानवतेच्या सेवेत झोकून सेवा देत आहेत. परंतु काही प्रसिध्दी माध्यमे चांगले जनहिताचे सेवाकार्य जगासमोर येवूच नये या उद्देशाने कार्य तर करित नाही ना ? अशी शंका येते. ज्यामुळे मानवतेचे सर्व दृष्टीने भले होईल. आपला व जगाचा उध्दार होईल हे न दाखविता अनावश्यक विकृती स्वस्वार्थाकरिता निर्मीती करणाऱ्या बाबी सतत दाखवल्या जातात हे योग्य वाटत नाही असे वाटते. त्यांनी मानवता समोर ठेवून आपली पूर्ण यंत्रणा मानवतेच्या हिताने राबवावी ही विनंती करावीशी वाटते. श्रीवर श्रध्दातर आहेच सोबत संस्थेबद्दल सर्वदुर आस्था दिसून येत आहे. अशा समयी काही अघटित घडल्यास सव्याज आम्हाला परत करतील याचा सुध्दा नेम नाही. कोणाचे आयुष्य वा संस्थेचे भवितव्य नुसत्या एका शब्दाने वा एका साधारण चुकीच्या त्रुटीने काही घडल्यास प्रसार माध्यमांनी त्या वेळेस सद्सद् विवेक बुध्दी कायम ठेवून योग्य ते द्यावे. अशी सर्वांना विनंती.

काही ठिकाणी संधी साधु पणाचे प्रकार समोर येत आहेत

मूळ पादुका, प्रासादिक पादुका, श्रींची चिलीम व मुर्ति वा श्रींच्या तथाकथित वस्तु मिरवणे चालु आहे.अशा प्रकारे प्रसिध्दी देऊन त्या वस्तु खऱ्या असतील तर संस्थानला न देता, संस्थानची परवानगी न घेता फिरवत बसणे, या मागे त्यांचा उद्देश काय असावा ? हे लक्षांत घ्यावे. 

श्री गजानन महाराजांच्या नावाने सहकुटुंब लक्षदीप प्रज्वलित कार्यक्रमाचे आयोजन करून व ठराविक रक्कम घेवून योजनाबद्ध पैसा जमा केल्या जातो वा अनेक तऱ्हेच्या यज्ञाव्दारे विशेष प्रचार करून पैसा जमा करण्याचे तंत्र उदयास येत आहे. अशा योजनेपासून सर्व भक्तांनी सतर्क राहावे.

प्रासादिक मूर्ती, पादुका, इतर वस्तु, चिलीम वगैरे चमत्कारिकरित्या प्रसाद रूपाने शेगांव मधून मिळाली. संस्थानकडून वा श्रींना स्पर्शकरून अनेक वस्तु आणल्या म्हणून अनेक लोक भावनिक संबंध जोडू इच्छीतात. तसेच शेगांवचे प्रसाद पाकीट स्वस्वार्थाकरीता देऊन स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात असा बाजारूपणा काही लोक करीत आहेत, अशापासून सावध असावे. वस्तुत: ज्या काही वस्तू श्रींच्या कृपेमुळे प्राप्त झाल्या तसेच अनुभव, अनुभूती वगैरे हा त्यांचा वैयक्तिक भाग असावा. त्याची वाच्यता करता कामा नये व बाजारूपणा भक्तिभावनेत येऊ देऊ नये ही संस्थानची अपेक्षा.

श्रींच्या प्रती असलेल्या अतूट श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही मंडळी श्रींच्या नावाचा संदर्भ देऊन व भयनिर्माण करून भक्तांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न पत्रके वाटून करीत आहेत. अनेक हस्तपत्रकांमध्ये  श्रींचा उल्लेख असलेली घटना, प्रसंग घडलेली नसून व तशी संस्थानकडे माहितीसुध्दा नाही. याव्दारे भाविकांमध्ये गोंधळ पसरविण्याचा व्यर्थ उपद्व्याप करीत आहेत. तरी भक्तांनी अशा अपप्रवृतीपासून सतर्क राहावे.