दर्शनबारी  : 

श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शेगावच्या पुण्यनगरीत येतात. या भक्तांना श्रींच्या दर्शनाचा लाभ विनासायास घडावा यासाठी श्री संस्थानने दर्शनबारी या भव्य वास्तूची निर्मिती केली आहे. एकाच वेळी हजारो भाविक या दर्शनबारीतून शांतपणे श्रींच्या दर्शनाची आस उराशी घेऊन शांतपणे मार्गक्रमण करतानाचे दृश्य पाहून भाविक मन सुखावते. भक्तांना श्रींचे दर्शन व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे, या उद्देशाने संस्थानने दर्शनबारीचे आयोजन केले आहे.

दर्शनाची रांग एकसंघ रहावी म्हणून मार्गिकांमध्येच भक्तांना बसण्यासाठी दर्शनबारीतील बाकांची व्यवस्था केली आहे. तिथे हवा खेळती रहावी आणि उकाड्याचा त्रास होऊ नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही बाजूस मार्गिकेला लागूनच पाण्याचे वाटप करण्याची व्यवस्था आहे. येथूनच सेवाधारी रांगेतील भक्तांना पिण्याचे पाणी पुरवतात, जेणेकरून भक्तांना रांग सोडून जाण्याची गरज लागत नाही.

  

 

 

श्री मुख दर्शन :

श्रींच्या दर्शनापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून श्रीमुख दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. अपंग, वृद्ध यांना दर्शन रांगेत उभे राहणे शक्य होत नाही, ते सुध्दा श्रींच्या दर्शनापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्याकरीता सुद्धा व्यवस्था केलेली आहे. श्रीमुख दर्शन घेताना भक्तांना आपल्या आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते. गाभाऱ्या समोरील प्रशस्त मोकळ्या जागेतून श्रींचे ‘डोळाभरून' दर्शन घेता येते.

 

दर्शनबारीमध्ये असणाऱ्या सुविधा :-

प्रथमोचार केंद्र :- 

भक्तांना प्रथमोपचाराची गरज पडल्यास दर्शनबारीच्या सभागृहाला लागूनच असणाऱ्या प्रथमोचार केंद्रामध्ये औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिशुचे क्षुधा शमनार्थ मातेकरीता व्यवस्था :-

तान्ह्याबाळांच्या दुग्धपानासाठी एक ‘विशेष कक्ष' प्रथमोचार केंद्राला लागून उभारण्यात आला आहे.  दर्शनार्थी मातांना इथे त्यांच्या बाळांना दुग्धपान देता येते.

चहा वितरण हॉल :- 


रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांचा शीण घालविण्यासाठी विनामूल्य चहा वितरीत करण्यात येतो. इथे गर्दीचे वेळी चहाचे वितरण होते. 

वातानुकूलित व्यवस्था :- 

श्रींच्या भक्तांकरीता, उकाड्याचा त्रास होऊ नये तसेच हवा खेळती रहावी म्हणून अद्ययावत वातानुकूलित व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

प्रसाधन गृह :- 

भक्तांना प्रसाधनगृहात जायचे असल्यास सोबत असलेले हार/फुले/नारळ इत्यादी साहित्य कुठे ठेवायचे असा प्रश्न पडतो. म्हणून संस्थानने प्रसाधनगृहांबरोबर पूजासाहित्य ठेवण्यासाठी लाकडी कप्पे उपलब्ध करून दिले आहेत.