श्रींचे अवतार कार्य व लीला प्रसंग 

श्रींचा कार्यउपदेश (अमृतवाणी)      श्रींचा स्पर्श झालेला पवित्र ठेवा

 


काम, क्रोध, मोह, मत्सर व अहंकार यांनी वेढलेल्या मानवाला चिंता आणि विवंचनापासून मुक्ती मिळवण्याकरीता योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ईश्वराच्या आराधनेतून मानवाला सन्मार्गावर आणण्याचे महान कार्य संत करीत असतात. असेच एक संत २३ फेब्रुवारी १८७८ रोजी महाराष्ट्रातील शेगावी प्रकट झाले, ते म्हणजे श्री गजानन महाराज.

शेगांवातील दोन सज्जन बंकटलाल आणि दामोदर यांनी एक तरुण दिगंबर विदेही व तेज:पुंज मूर्ती देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्टया पत्रावळीतील शितं वेचून खात असताना पाहिली. नंतर गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या हौदातील पाणी पिऊन निघुन गेली. तेव्हा त्यांची लक्षणं पाहून हे थोर संत व योगीपुरुष असल्याची जाणीव बंकटलालांना झाली. त्या नंतर महाराजांचे विविध लिलाप्रसंग अनेक भक्तांनी अनुभवले. 

बार्शीटाकळी येथील श्री गोविंद महाराज टाकळीकर हे शेगांवातील मोटे यांच्या श्री महादेवाच्या मंदिरात कीर्तन करीत असताना त्यांना श्री गजानन महाराज हे सिध्दपुरुष आहेत हे जाणवले. महाराजांनी टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले. कीर्तन सुरू होण्याआधी बंकटलाल आणि पितांबरने 'श्री' ना झुणका भाकर आणून दिली. त्या नंतर 'श्रीं च्या  आज्ञेवरून पितांबराने नाल्यात तुंबा बुडवून त्यांच्यासाठी पाणी आणले. आणि आश्चर्य म्हणजे तुंब्यातील पाणी स्वच्छ झाले होते.

बंकटलालांना 'श्रीं' च्या बद्दल आत्मीयता, आदर वाटल्याने त्यांनी 'श्रीं' ना त्यांच्या घरी नेऊन आंघोळ घालून त्यांची पूजा केली. पुढे बंकटलालचे चुलत भाऊ इच्छाराम हे सुद्धा श्री गजानन महाराजांचे परम भक्त झाले. त्यांनीसुद्धा 'श्रीं' ना आपल्या घरी नेऊन त्यांची यथाशक्ती पूजा केली.

एकदा श्री गजानन महाराजांना पहाटे चिलीम पेटवण्यासाठी विस्तव हवा होता. त्यांनी जानकीराम सोनाराकडे विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने मुलांना नकार दिला. तेव्हा श्री महाराजांनी विस्तवाविना चिलीम पेटवली. अक्षय तृतीयेच्या दिवशी जानकीरामच्या घरी आलेल्या अतिथींच्या पानात वाढलेल्या चिचवणीत अळ्या आढळल्याने सर्व अतिथी पानावरून उठून गेले.

श्री गजानन महाराजांस चिलीम ओढण्यासाठी विस्तव न दिल्याने ही घटना घडली हे जाणून जानकीरामने आपली चूक कबूल केली व महाराजांची क्षमा मागितली व तत्क्षणी चिचवणीतील अळ्या नाहीशा झाल्या.
अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या लिलांचा अनुभव अनेकांना आला. अकोली, अडगांव जवळ कोरड्या विहिरीत जलाशय निर्माण करून भास्कर पाटील आणि गावकऱ्यांना महाराजांनी थक्क केले. बंकटलालने कणसे खाण्यासाठी महाराजांना आणि काही गावकऱ्यांना मळ्यात नेले असताना कणसे भाजण्यासाठी आग पेटविल्यामुळे मधमाशा पोळयातून बाहेर पडल्याने सगळ्यांनी धूम ठोकली. मात्र महाराज शांतपणे त्याच जागी बसले. शरीराला यत्किंचितही इजा झाली नाही.

श्री. हरी पाटलांसारख्या श्रेष्ठ कुस्तीगिराच्या शक्तीचे महाराजांनी गर्वहरण केले. मारुती मंदिरात पाटलाच्या मुलांनी पाठीवर उसाचा मार दिला असता महाराजांनी हातानी रस काढला आणि सर्वांना प्यायला दिला. महाराजांच्या आशीर्वादाने अनेक वर्षे संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्न प्राप्त झाले.

जानरावाचा आजार महाराजांचे तीर्थ ग्रहण करून बरा झाला तर कारंजाच्या लक्ष्मण घुडेंनी महाराजांनी दिलेला आंबा खाल्यावर त्यांची व्याधी दूर झाली. प्लेगची साथ आली असताना प्लेगची लागण झालेल्या पुंडलीक भोकरेच्या काखेत महाराजांनी आपला अंगठा लावताच आरोग्यात सुधारणा व्हायला लागली आणि पुंडलीक दोन दिवसात बरे झाले.

पुंडलीक भोकरे सारख्या निस्सिम सेवक भक्ताला आपल्या पादुका दिल्या. बाळापूरला समर्थ रामदासी परम भक्त बाळकृष्ण आणि पुतळाबाईना श्रींनी समर्थांच्या स्वरूपात दर्शन दिले. अमरावतीच्या गणेशआप्पा नावाच्या गरीब भक्तास महाराजांनी त्याच्या घरी जाऊन त्याला भेट दिली. पंढरपूरला बापुना काळेंना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे रूप धारण करून दर्शन घडवले.

सोमवती अमावस्येच्या दिवशी काही भक्तांसमवेत श्री महाराज नर्मदास्नानासाठी व ओंकारेश्वर दर्शनासाठी गेले होते. नर्मदेच्या जलप्रवासात नावेत पाणी शिरले. तेव्हा महाराजांच्या कृपेने नर्मदेने एका कोळिणीचे रूप धारण करून नाव काठास लावली व त्यांना वाचविले.

बंडू तात्याला गुप्त धनाची वर्दी देऊन त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. श्रींनी सुकलालच्या व्दाड गाईला शांत केले, ब्रह्मगिरी पंडित आपले ज्ञान पाजळायला लागल्यावर पेटलेल्या पलंगावर बसून महाराजांनी गोसाव्यास त्याच पलंगावर बसायला सांगितले. भयभीत झालेल्या ब्रह्मगिरीचे गर्वहरण झाले. 

शिवजयंतीच्या प्रीत्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले. त्या सभेत महाराजांनी असे भाकीत वर्तवले की लोकमान्यांना कारावास भोगावा लागेल आणि प्रत्यक्षात खरंच लोकमान्यांना मंडालेच्या तुरूंगात जावे लागले. तेथे ‘गितारहस्य‘ हा ग्रंथ लिहिला गेला.

या सर्व घटनाव्यतिरीक्त कुष्ठरोग बरा होणे, भाकरी प्रसादाने महान कामगिरी होणे. स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेप्रवास करणे, मृत कुत्रा जिवंत होणे या लिलांव्दारे महाराजांची थोरवी सर्वांना जाणवत होती. (अधिकृत श्री गजानन विजय ग्रंथाच्या आधारे)

‘‘गणि गण गणात बोते‘‘ असे भजन महाराज अहर्निश करत असत. म्हणूनच लोक त्यांना 'श्री गजानन महाराज' म्हणून संबोधू लागले. त्यांना लोक बहुमोल वस्त्रे, अलंकार, पैसा, खाद्यपदार्थ देत पण ते तिथेच सोडून कोठेही निघून जात, दिगंबरवृत्तीचे महाराजांना खाण्याचेही भान नसे. कुठेही पडून रहात असत आणि कधीही कुठेही मुक्तपणे संचार करत असत. (परमहंस अवस्था)

त्यांना आपले अवतारकार्य संपत आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी आपल्या भक्तांना तसे सूचीत केले आणि ८ सप्टेंबर १९१० रोजी ते शेगांवातच समाधिस्त झाले.